“पोलिस महानगर”च्या बातमीचा इम्पॅक्ट! मनपा व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नागरिक संतप्त
रवि निषाद / मुंबई
मुंबई – चेंबूर परिसरातील जय अंबेनगर भागात सुमारे ७० वर्षे जुन्या नैसर्गिक तलावाची बेकायदेशीर भरणी करून झोपडीमाफियांकडून सुरू झालेल्या बांधकामांवर अखेर “पोलिस महानगर”च्या वृत्तानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि पूर्व उपनगरचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून तलावाची पुनर्स्थापना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तलाव भरणीचा उघड घोटाळा
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेला जय अंबेनगर परिसरातील हा तलाव पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महत्त्वाचा जलसाठा होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून काही माफियांकडून या तलावात मुरूम आणि बांधकामातील अवशेष टाकून जमिनीची बेकायदेशीर भर घालण्यात येत आहे.
संगम, सफलता, आश्रय, पिकनिक पॉइंट, रॉयल आणि समृद्धी लॉजिंगच्या मागील भागात ही भरघाल सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
नागरिकांचा आक्रोश
“ही कामे अक्षरशः दिवसाढवळ्या सुरू आहेत. मनपा आणि पोलिस यंत्रणा मूकदर्शक बनली आहे. तलाव संपला तर पुढच्या पावसात निचऱ्याचा प्रश्न गंभीर होईल,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या बेकायदेशीर भरणीमागे दिवाकर प्रजापती या कुख्यात झोपडामाफियाचा हात असून त्याचे काही साथीदार या कामात सक्रिय आहेत. दिवाकर बाहेरगावाहून कामगार बोलावून तलावात मुरूम टाकणे आणि झोपड्या उभारण्याचे काम करवतो, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “दिवाकर हा प्रभावशाली आणि चलाख आहे. त्याच्याविरोधात तक्रारी आल्या तरी कारवाई फारशी होत नाही.” काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या तक्रारीवर फक्त नोटीस देऊन प्रकरण थंडावल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
पर्यावरणाचा इशारा
पर्यावरणप्रेमींनी इशारा दिला आहे की, “जर ही भरणी तत्काळ थांबवली नाही, तर पुढील पावसाळ्यात जय अंबेनगर परिसरात जलनिकासी व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल आणि गंभीर पूरस्थिती निर्माण होईल.”
प्रशासनाची हालचाल
“पोलिस महानगर”ने या प्रकरणावर प्रकाश टाकल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चौकशीची चाके वेगात फिरवली आहेत. अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी संबंधित विभागांना “अवैध बांधकाम तत्काळ निष्काषित करून तलावाचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्याचे” आदेश दिले आहेत.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
१. तलाव भरणी तात्काळ थांबवावी
२. सर्व बेकायदेशीर झोपड्या हटवाव्यात
३. दिवाकर प्रजापती व सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत
४. तलावाचा मूळ नकाशा जतन करून पुनर्स्थापना करावी
चेंबूरकरांची मागणी एकच — “तलाव वाचवा, चेंबूर वाचवा!”