अनिल अंबानींवर फसवणुकीचा नवा गुन्हा; पीएनबी प्रकरणी सीबीआयची कारवाई

Spread the love

अनिल अंबानींवर फसवणुकीचा नवा गुन्हा; पीएनबी प्रकरणी सीबीआयची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

नवी दिल्ली : बँक कर्जातील कथित गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम)च्या काही संचालकांविरुद्ध केंद्रीय तपास ब्युरो (सीबीआय)ने फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)च्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून २०१३ ते २०१७ या कालावधीत सुमारे १,०८५ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

सीबीआयने भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि १२०बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पीएनबीचे व्यवस्थापक संतोषकृष्ण अन्नवरपु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या निधीचा कथित गैरवापर केला.

तक्रारीनुसार या व्यवहारात पीएनबीला सुमारे ६२१.३९ कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर युनायटेड बँक ऑफ इंडिया (जिचे नंतर पीएनबीमध्ये विलीनीकरण झाले) ला सुमारे ४६३.८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीने घेतलेले कर्ज बँकेला माहिती न देता इतर ठिकाणी वळविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने अनिल अंबानी आणि आरकॉमविरोधात आणखी एका बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात बँक ऑफ बडोदा सोबत २०१३ ते २०१७ या कालावधीत २,२२० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रवर्तन निदेशालय (ईडी)नेही अंबानी यांच्या विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. मुंबईतील ‘एबोड’ नावाचा आलिशान बंगला तसेच दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी येथील निवासी घरे, कार्यालयीन जागा व जमिनींचाही त्यात समावेश असल्याचे सांगितले जाते.

मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आतापर्यंत सुमारे १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात एकूण सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon