महिला दिनानिमित्त ठाण्यात ‘रणरागिणी’ सायकल राईड; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love

महिला दिनानिमित्त ठाण्यात ‘रणरागिणी’ सायकल राईड; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रणरागिणी सायकल राईड’ला रविवारी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका भवन येथून या सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. रंगीबेरंगी वेशभूषा, सजवलेल्या सायकली आणि महिला सक्षमीकरणाचे संदेश देणारे फलक यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

या वेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सहभागी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला आज प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत असून कुटुंबाच्या पाठबळामुळे त्या अधिक सक्षम होत असल्याचे मत महापौर पिंपळोलकर यांनी व्यक्त केले. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात प्रगती साधली असून अशा उपक्रमांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळते, असे उपमहापौर पाटील यांनी सांगितले.

या सायकल राईडमध्ये ३.५ आणि ५.५ किलोमीटर अशा दोन गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सकाळी ७.१० वाजता ३.५ किमी आणि ७.३५ वाजता ५.५ किमी अंतराच्या राईडला प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध आयुर्वेद स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, ‘हिंदायान राईड’चे संस्थापक विष्णूदास चापके तसेच फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांच्या उपस्थितीत सायकल राईडला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यानंतर आयोजित ‘रणरागिणी पुरस्कार’ सोहळ्यात सायकलिंगमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या मंगला पै यांना ‘रणरागिणी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मधुरा कुलकर्णी यांना ‘रणरागिणी गौरव’ पुरस्कार देण्यात आला. सविता ननोरे आणि चौथीत शिकणारी अपूर्वा फर्डे यांना ‘रणरागिणी पुरस्कार’, तर सीमा कुळकर्णी आणि आनंदी भोसले यांना ‘मातृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

दरम्यान, दृष्टीहीन असूनही तीन हजार किलोमीटरहून अधिक सायकलिंग पूर्ण करणाऱ्या अपर्णा अग्रवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्या सायकलपटू आणि मॅरेथॉन धावपटू असून ‘बॅरियर्स बस्टर’ या त्यांच्या पुस्तकाविषयीही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon