नवी मुंबई पोलिसांची मध्यरात्री धाड; ड्रग तस्करांविरोधात कारवाई, पाच जणांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : ड्रग तस्करी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मध्यरात्री अचानक धाडसत्र राबवत विविध ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत नायजेरियन व बांगलादेशी नागरिकांसह पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा तसेच मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला.
नवी मुंबई पोलीस यांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेत एपीएमसी मार्केट परिसरातील कोल्ड स्टोरेज, झोपडपट्ट्या आणि प्रमुख चौकांवर एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी संशयित ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली.
दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची सखोल तपासणी करण्यात आली. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे ड्रग तस्करांचे धाबे दणाणल्याचे पोलिसांनी सांगितले.
या मोहिमेदरम्यान काही संशयितांकडून गावठी कट्टा आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपींकडून पुढील चौकशी सुरू आहे. शहरात अवैध धंदे आणि ड्रग तस्करी रोखण्यासाठी अशा धाडसत्रे पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.