ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट; २४,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निर्देश देत यंदा कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे ठाणे महापालिकेतील सुमारे ९,२२१ कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक उजळणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना २४,००० रुपयांचे अनुदान मिळाले होते, तर यावर्षी ते वाढवून २४,५०० रुपये करण्यात आले आहे. हे अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत. महापालिकेचे ६०५९ कर्मचारी, शिक्षण विभागातील ७७४ कर्मचारी, परिवहन विभागातील १४०० कायम कर्मचारी तसेच थेट कंत्राटी व इतर ९८८ कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या सानुग्रह अनुदानामुळे ठाणे महापालिकेवर सुमारे २३ कोटी रुपयांचे अतिरिक्त दायित्व येणार आहे. तरीही, कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदात भर घालण्यासाठी आणि त्यांच्या वर्षभराच्या परिश्रमांचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या निर्णयामुळे महापालिका परिसरात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.