४८ वर्षांनंतर न्यायाच्या जाळ्यात!
महिलेवर हल्ला करून कोकणात लपलेला आरोपी अखेर पकडला
मुंबई : प्रतिनिधी
सुमारे अर्धशतकानंतर मुंबई पोलिसांनी एका जुन्या गुन्ह्याचा धागा पकडत तब्बल ४८ वर्षे फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. १९७७ साली महिलेवर चाकू हल्ला करून जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेला हा आरोपी पोलिसांना चकवत अखेर कोकणातील दापोली परिसरात जाऊन स्थायिक झाला होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केवळ नावावरून पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव चंद्रशेखर मधुकर कालेकर (वय सध्या ७१) असं असून तो मूळचा लालबाग, मुंबई येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १९७७ साली किरकोळ वादातून त्याने एका महिलेवर चाकूने सपासप वार केले होते. या प्रकरणी त्याच्यावर हत्येचा प्रयत्न (IPC कलम ३०७) असा गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं, मात्र जामिनावर सुटताच तो गायब झाला.
यानंतर चंद्रशेखर कालेकरने सांताक्रुज, माहीम, गोरेगाव, बदलापूर अशा विविध भागात राहण्याची ठिकाणं बदलत पोलिसांना चकवले. अखेरीस तो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात जाऊन स्थायिक झाला. दरम्यान, कोर्टात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. पोलिसांच्या हाती त्याचे नाव व चाळीचा पत्ता एवढीच माहिती शिल्लक होती. त्यामुळे तपास हळूहळू थंडावला.
तथापि, काही महिन्यांपूर्वी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी हा जुना तपास पुन्हा उघडला. त्यावेळी तपास अधिकार्यांच्या हाती फक्त नावाचा धागा होता. मात्र पोलिसांनी निवडणूक आयोग आणि आरटीओ विभागाच्या पोर्टल्सचा वापर करून शोधमोहीम सुरू केली. त्यातून ‘चंद्रशेखर मधुकर कालेकर’ नावाचा एकच मतदार रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात असल्याचं उघड झालं.
पोलिसांनी दापोली पोलीस ठाण्यातून अधिक माहिती घेतली असता, त्याच नावाच्या व्यक्तीवर २०१५ मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद झाल्याचं आढळलं. आरटीओ कार्यालयातून त्याचं वाहन परवाना आणि फोटो मिळाल्यानंतर पोलिसांनी ओळख निश्चित केली. तत्काळ पथकाने दापोलीत धडक देत आरोपीला अटक केली.
अचानक पोलिसांसमोर उभा ठाकलेला पाहून चंद्रशेखर कालेकर अवाक झाला. ४८ वर्षांपूर्वी केलेला गुन्हा त्यालाही आठवत नव्हता, मात्र पोलिसांनी सर्व पुरावे आणि माहिती समोर ठेवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिसांच्या चिकाटीचे आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे.