४ कोटी ७ लाखांचे दागिने आणि रोकड चोरी करणारे तीन आरोपी अटकेत; ७० टक्के मालमत्ता जप्त
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – परळ येथील ए. जलिचंद ज्वेलर्स शॉपमधून तब्बल ४ कोटी ७ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरी करणाऱ्या तीन आरोपींना भोईवाडा पोलिसांनी मुद्दमालासह अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ७० टक्के चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली असून उर्वरित मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू आहे. ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता ते ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. शॉपमध्ये काम करणारा कामगार जितु नवाराम चौधरी (२३, रा. राजस्थान) याने दागिने व रोकड चोरी करून फरार झाला होता. फिर्यादीच्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक राजस्थानला रवाना करण्यात आले. त्याचबरोबर गुन्हे शाखा, कक्ष ४, मुंबई यांनीही समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी पाहिजे आरोपी जितुसह त्याचे दोन साथीदारांना अटक केली.
अटक आरोपींची नावे :
१. जितु नवाराम चौधरी (२३ वर्षे) – रा. सादडा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान
२. कमलेश वाघाराम चौधरी (२६ वर्षे) – रा. न्यू आबादी, भंडारवाजव, कुडाळा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान
३. भरतकुमार ओटाराम चौधरी (३८ वर्षे) – रा. जुनी मोहिला वास, कुडाळा, ता. बाली, जि. पाली, राजस्थान
या कारवाईतून ७० टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून उर्वरित मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्य नारायण चौधरी व लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने व शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त श्रीमती रागसुधा आर. व राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली तसेच प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक घन:शाम पलंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन महाडीक, पोलीस उपनिरीक्षक सचिन बोरसे, अमित कदम, ओंकार आडके, पो. ह. संतोष खेडेकर, पो. शि. अविनाश सुतार, प्रदिप राठोड, शंकर जोशी तसेच गुन्हे शाखा कक्ष ४ चे सहायक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, पो. ह. महाजन, पो. शि. जावीर व पो. शि. चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली. या धाडसी कामगिरीमुळे ज्वेलर्समध्ये दिलासा तर पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.