घाटकोपरमध्ये एसी कॉम्प्रेसरचा स्फोट; मोठे आर्थिक नुकसान, जीवितहानी टळली
रवि निषाद / मुंबई

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील पाटीदार हॉल परिसरात असलेल्या शिवनगर येथील एस.आर.ए. इमारतीत एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या आगीत घरातील फर्निचर व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शिवनगरमधील एस.आर.ए. इमारत सी-विंग, खोली क्रमांक ३०६ येथील गॅलरीत लावलेल्या एसीच्या कॉम्प्रेसरचा रात्री सुमारे १२.३० वाजता अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेली आग तिसऱ्या मजल्यावरून काही वेळातच चौथ्या मजल्यापर्यंत पसरली, त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि घाटकोपर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीमुळे संबंधित घरातील फर्निचर, विद्युत उपकरणे व अन्य साहित्य जळून खाक झाले.
एसी कॉम्प्रेसरचा स्फोट हेच आगीचे प्राथमिक कारण असल्याची माहिती असून, घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांनी सांगितले.