मोक्का गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कैलाश उर्फ के.पी. अखेर अटकेत
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी वर्षभरापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कैलाश उर्फ के.पी. (वय ५४) याला अखेर अटक केली. उल्हासनगरचा रहिवासी असलेल्या कैलाशवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि धुळे येथे एकूण ३५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ब्ल्यू गेट, पी. डी. मेलो रोड परिसरात फिर्यादी स्कुटीवरून जात असताना तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या पुतण्यावर बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्या तसेच सुमारे ४७.२७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथम चार आरोपींना अटक करण्यात आली. पुढील चौकशीत कैलाश उर्फ के.पी. हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तो सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथे शोधमोहीम राबवूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
अखेर रायगड जिल्ह्यातील नेरळ बाजारपेठेत आरोपी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी नेहमी शस्त्र बाळगत असल्याची नोंद लक्षात घेऊन गुप्त पथकाने वेशांतर करून सापळा रचला. संशयित दिसताच पोलिसांनी घेराव घालून त्याला शिताफीने अटक केली.
अटकेदरम्यान आरोपीकडून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे तसेच सुमारे १२.९१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.