मुलुंडमध्ये गुटखा–सुगंधित सुपारीचा सुमारे दोन कोटींचा साठा जप्त
पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित सुपारीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ ७ अंतर्गत मुलुंड पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे दोन कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दहा आरोपींना अटक करण्यात आली असून १४ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
परिमंडळ ७ चे पोलीस उपआयुक्त हेमराजसिंह राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, ऐरोली टोलनाकाजवळील बंद असलेल्या जुन्या जकातनाक्याच्या मोकळ्या जागेतून मुंबई परिसरात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारीची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीनंतर मुलुंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल करांडे, योगेश पाटील व मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ऐरोली टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तीन आयशर ट्रक, दहा अन्य वाहने व एक कारसह एकूण १४ वाहने आणि दहा इसमांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान वाहनांमधून विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याचा साठा आढळून आला. यात ‘प्रीमियम जाफरानी जर्दा’, ‘कॅश गोल्ड फ्लेवर्ड पान मसाला’, ‘व्हीसी-५ च्युइंग टोबॅको’, ‘वाराणसी आशिक गुटखा’, ‘प्रीमियम राज निवास सुगंधित पान मसाला’, ‘एसएके गुटखा’ आदी पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांची किंमत सुमारे ८०.५५ लाख रुपये असून, जप्त वाहनांची किंमत अंदाजे १ कोटी २०.७५ लाख रुपये आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ कोटी १ लाख रुपये आहे.
या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिल अबुबकर शेख (वय ३७) व सिराज उनउल्लहक सिद्धकी (वय ३०) यांच्यासह दहा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपआयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या देखरेखीखाली मुलुंड पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.