धक्कादायक! नंदूरबारमध्ये कंटेनरमधून विदेशी बनावट दारुची तस्करी उघड; ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
नंदूरबार – जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. भरदिवसा लाल कंटेनरमधून विदेशी बनावट दारुची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ८४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, राजस्थानमधील सुरेश बिश्नोई या तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तात्काळ सापळा रचून कंटेनरची झडती घेण्यात आली. यावेळी कंटेनरमध्ये १ हजार २०० खोकी विदेशी बनावट दारु आढळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट दारुची तस्करी थेट जिल्ह्यात होत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
दारु तस्करीविरोधातील ही कारवाई शहादा पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. या प्रकरणात तस्कर सुरेश बिश्नोई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहादा पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.
परराज्यातून बनावट दारु आणून जिल्ह्यात तस्करी होत असल्याने समाजात आरोग्य व कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करून इतर संबंधित आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.