आयफोन १७ खरेदीसाठी बीकेसीत तरुणाईची झुंबड; स्टोअरबाहेर राडा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ॲपल कंपनीच्या आयफोन १७ सिरीजचे शुक्रवारपासून विक्रीसाठी बाजारात आगमन झाले असून नव्या आयफोनसाठी मुंबईत ग्राहकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे या वेळीही नव्या आयफोनसाठी चाहत्यांची झुंबड उडाली. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील ॲपल स्टोअरबाहेर भल्या पहाटेपासून हजारो तरुण-तरुणी रांगेत उभे होते. या प्रचंड गर्दीत सकाळीच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रांगेत पुढे जाण्याच्या वादातून काही तरुणांमध्ये हाणामारी झाली. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही वाद झाले. या दरम्यान झालेल्या जोरदार राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे बीकेसी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आयफोनची नवीन १७ सीरीज अत्याधुनिक कॅमेरा तंत्रज्ञान, सुधारित बॅटरी परफॉर्मन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुविधा यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आहे. त्यामुळे या मॉडेलसाठी मुंबईतील तरुणाईमध्ये प्रचंड आकर्षण असून मोठ्या संख्येने ग्राहक पहिल्याच दिवशी स्टोअरवर दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी बीकेसी परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात केली असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयफोनच्या पुढील विक्रीदरम्यान ग्राहकांनी संयम राखण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.