इंस्टाग्रामवरील मैत्रीतून तरुणीची एक लाखांची फसवणूक; आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी : सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्या बँक खात्यातून सुमारे एक लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे. ही घटना १३ व १४ डिसेंबर २०२५ दरम्यान चऱ्होली बुद्रुक परिसरात घडली.
या प्रकरणी एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तन्मय अमोल पांडे (वय १९, मूळ रा. यवतमाळ, सध्या हिंजवडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तन्मय पांडे याने फिर्यादीच्या भाचीशी इंस्टाग्रामवर मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिला संशयास्पद लिंक पाठवून एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. संबंधित ॲप डाऊनलोड करताच आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवले आणि तिच्या बँक खात्यातून ९२ हजार ७९४ रुपये काढून घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत असून सोशल मीडियावरील फसवणुकीच्या प्रकारांबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.