म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने ज्वेलर्सची फसवणूक; दोन वॉण्टेड आरोपींना मालाड पोलिसांकडून अटक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : स्वस्त दरात म्हाडाचे फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन वॉण्टेड आरोपींना अखेर मालाड पोलिसांनी अटक केली आहे. सतीश सुरेशराव जाधव आणि महादेव पंढरीनाथ बोधले अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. याच गुन्ह्यात त्यांचे दोन सहकारी सचिन सुरेश धुरी आणि योगेश पांडुरंग पोटे हे सहआरोपी असून, चौघांवर गुन्हा दाखल आहे.
फसवणूक झालेला तक्रारदार हा व्यावसायिक ज्वेलर्स असून तो आपल्या कुटुंबियांसह मालाड परिसरात राहतो. काळबादेवी येथे त्याचे ज्वेलर्सचे दुकान होते. पाच वर्षांपूर्वी आरोपींनी परळ आणि दादर परिसरात म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून तब्बल एक कोटी दोन लाख रुपये घेतले होते. मात्र फ्लॅटचा ताबा देणे तर दूरच, उलट आरोपींनी त्याला सतत टाळाटाळ करत फसवले.
तक्रारदाराने अनेकदा पैसे परत मागितल्यावर आरोपींनी त्याला एक धनादेश दिला. मात्र तो बँकेत वटला नाही आणि परत आला. त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ज्वेलर्स व्यापार्याने चौघांविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली.
सदर गुन्ह्यात वॉण्टेड असलेले सतीश जाधव आणि महादेव बोधले यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांच्या चौकशीला वेग आला असून, या प्रकरणातील इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.