रेल्वे टेंडर प्रकरणात ३८ कोटींच्या बँक गॅरंटीची बतावणी करून फसवणूक; चार जण अटक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : रेल्वे टेंडरसाठी बनावट बँक गॅरंटी देण्याचे आमिष दाखवून खासगी कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आशिषकुमार हरिश्चंद्र सिंग, हरिचंद्र विष्णूदत्त तिवारी, हेमंत हरिश जोशी आणि सॅम डिसोजा या आरोपींचा समावेश आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी परिसरातील एका खासगी कंपनीला बंगलोर येथे रेल्वे विभागाचे क्रॉस लाईनचे कंत्राट मिळाले होते. मात्र कंपनीची बँक गॅरंटी संपल्याने त्यांना नव्याने ३८ कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीची आवश्यकता होती. याच संधीचा गैरफायदा घेत जय दोशी आणि ब्रिजेश भुट्टा या दोघांनी कंपनीतील पीआरओला संपर्क साधला. त्यांनी बँक गॅरंटी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी साडेचार कोटी रुपये कमिशन म्हणून स्वीकारले.
नंतर तपासाअंती बँकेकडून अशी कोणतीही गॅरंटी जारीच झालेली नसल्याचे उघड झाले. फसवणुकीची कल्पना आल्यानंतर कंपनीने तातडीने चारकोप पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या.
कोट्यवधींचा बनावटी बँक गॅरंटी घोटाळा उघड
या कारवाईनंतर पोलिसांनी उर्वरित आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.