उल्हासनगरात दरोडेखोरांचा हैदोस! रिक्षातून जाणाऱ्या तरुणाला लुटलं, चाकू दाखवत पलायन

Spread the love

उल्हासनगरात दरोडेखोरांचा हैदोस! रिक्षातून जाणाऱ्या तरुणाला लुटलं, चाकू दाखवत पलायन

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : उल्हासनगरात पुन्हा एकदा दरोडेखोरांचा धुमाकूळ समोर आला आहे. २७ वर्षीय अजयकुमार शामल गौतम हे २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आपल्या मित्रासह रिक्षाने श्रीराम चौक ते उल्हासनगर कॅम्प क्र.५ या मार्गावर जात होते. दरम्यान, सरकारी प्रसुतीगृहाजवळील ‘रिअल टच’ दुकानाजवळ आरोपीने रिक्षा अडवून फिर्यादीसोबत किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केली.

यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्याच्या मित्राकडून तब्बल २१ हजार रुपयांची रोकड लुटली. एवढ्यावरच थांबता कामा नये म्हणून आरोपीने रिक्षाचालकाला देखील चाकू दाखवत स्टेशनच्या दिशेने पलायन केले. या घटनेची नोंद विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन सर्टीफाय स्कूलसमोरील मैदान, उल्हासनगर-४ येथे सापळा रचून आरोपी संजय रतन राठोड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील लुटलेले २१ हजार रुपये व चाकू जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीस १ सप्टेंबर रोजी पहाटे न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon