अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आईसह १० जणांविरोधात गुन्हा; प्रकरण शनिपेठ पोलिस ठाण्यात वर्ग
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव : अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्या आयुष्याशी खेळ केल्याप्रकरणी तिच्या आईसह नातेवाईक आणि प्रियकर अशा १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सुरुवातीला निंभोरा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता; मात्र पुढील तपासासाठी तो शनिपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील महिला जून महिन्यात तिच्या १५ वर्षीय मुलीला घेऊन जळगावला पुतणीकडे आली होती. त्यानंतर जबरदस्तीने मुलीचे लग्न चांगदेव तालुक्यातील एका तरुणाशी लावण्यात आले. लग्नानंतर पतीने संबंध ठेवण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलीवर मारहाण केली. त्यामुळे ती पतीचे घर सोडून जळगावातील चुलत बहिणीकडे परतली.
मात्र चुलत बहिणीच्या दिराने अल्पवयीन मुलीला घराबाहेर काढले. त्यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने तिच्या प्रियकराशी संपर्क साधून त्याला जळगावात बोलावले. प्रियकराने तिला कुसुंबा (ता. जळगाव) येथे एका महिलेकडे नेले. तेथे मुलगी व तिच्या प्रियकरामध्ये शारीरिक संबंध आल्याचे समोर आले.
हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने मुलीला घेऊन थेट निंभोरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी आई, चुलत बहीण, चुलत मेहुणा, त्याचा भाऊ, मुलीचा पती, मामसासरे, मामसासू, प्रियकर तसेच त्याला राहण्यासाठी मदत करणारी महिला अशा एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा ३१ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
बालविवाहासारख्या घटनांवर पोलिसांचा कठोर इशारा
पोलिसांनी या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो व इतर संबंधित कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून, अशा घटनांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.