ऑनलाईन रमीत पैसे हरला, कर्जबाजारी तरुणाने पत्नी अन् मुलाला विष पाजलं; नंतर स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला, धाराशिव हादरलं
पोलीस महानगर नेटवर्क
धाराशिव – जिल्ह्यातील बावी गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या पत्नी आणि दोन वर्षाच्या चिमुकल्यालाही विष देऊन ठार केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्हा हादरून गेला आहे. मृत तरुणाचे नाव लक्ष्मण मारुती जाधव (वय २९) असे असून, तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. लक्ष्मणला ऑनलाइन रमी खेळण्याचे व्यसन लागले होते. सुरुवातीला करमणुकीसाठी सुरू केलेला हा खेळ त्याच्या आयुष्याचा विनाशक ठरला. या जुगाराच्या नादात त्याच्यावर मोठे कर्ज जमा झाले होते. त्यातूनच निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
तीन वर्षांपूर्वी लक्ष्मणने गावातील तेजस्विनी (वय २१) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगा होता. कर्ज फेडण्यासाठी लक्ष्मणने स्वत:ची एक एकर जमीन आणि गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. मात्र, तरीही तो पूर्णपणे कर्जमुक्त होऊ शकला नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो तणावात होता. रविवारी रात्रीच्या सुमारास त्याने प्रथम पत्नी तेजस्विनी आणि चिमुकल्याला विष पाजले आणि नंतर स्वत:ने घरात गळफास घेतला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली, तेव्हा गावात शोककळा पसरली.
धाराशिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या दुर्दैवी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे शोधण्यासाठी सर्व शक्यतेचा विचार केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.