वर्सोव्यात मुंबई पोलिसांची धडक कारवाई; २५ बांगलादेशी घुसखोर अटकेत, २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समावेश
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शहरातील बेकायदेशीर घुसखोरीविरोधात मुंबई पोलीस यांनी धडाकेबाज कारवाई करत वर्सोवा परिसरातून २५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समावेश असून, हे सर्वजण गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही वैध कागदपत्रे नसताना मुंबईत वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले आहे.
वर्सोवा येथील शाकुलशहा दर्गा परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती बांगलादेश येथून बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान, हे सर्वजण कोलकाता आणि मिझोराम मार्गे भारतात प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर मुंबईत विविध ठिकाणी राहून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, कोणाकडेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा ओळखपत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी संबंधितांवर परकीय नागरिक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे. तसेच या घुसखोरीमागे कोणते एजंट किंवा साखळी कार्यरत आहे का, याचाही तपास मुंबई पोलीस करत आहेत.
शहरात बेकायदेशीर घुसखोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.