कल्याणमध्ये बेकायदा ‘युसूफ हाइट्स’ची फाईल गायब; महापालिकेच्या अभिलेख विभागावर संशयाची छाया
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात मौलवी कम्पाउंडजवळ उभारलेल्या ‘युसूफ हाइट्स’ या १० मजली बेकायदा इमारतीची फाईल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभिलेख विभागातून गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर अडके यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
‘युसूफ हाइट्स’ इमारतीशी संबंधित फाईलची माहिती सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती. ही माहिती देण्यासाठी महापालिकेने अभिलेख विभागात शोधाशोध सुरू केली असता संबंधित फाईलच उपलब्ध नसल्याचे आढळून आले. फाईल महाराष्ट्राबाहेर नेली असावी किंवा ती नष्ट करण्यात आली असावी, असा संशय महापालिका प्रशासनाने तक्रारीत व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार मौलवी कम्पाउंडनजीक बेघरांसाठी ३७६ चौरस मीटरचा भूखंड आरक्षित आहे. त्याशेजारील ११५ चौरस मीटरचा भूखंड खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. मात्र या दोन्ही आरक्षित भूखंडांवर ‘युसूफ हाइट्स’ ही इमारत उभारण्यात आली. २०१२ ते २०१४ या कालावधीत जमीनमालक असमत मौलवी आणि कुलमुखत्यारधारक सलमान डोलारे यांनी मिळून हा प्रकल्प विकसित केल्याचे तपासात समोर आले आहे.
बिल्डरने साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून महापालिकेला बनावट आराखडा सादर केल्याचा आरोप आहे. तसेच बनावट पूर्णता प्रमाणपत्र (ओसी) तयार करून महापालिकेची परवानगी मिळाल्याचा आभास निर्माण करण्यात आला.
कोट्यवधींची गुंतवणूक, फसवणूक
या इमारतीत दहा जणांनी गुंतवणूक केली असून, त्यांच्याकडून एकूण १ कोटी ८२ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन वर्षांपूर्वीच बाजारपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी बिल्डर सलमान डोलारे सध्या फरार आहे.
दरम्यान, याच बेकायदा इमारतीची फाईल गायब झाल्याने आरोपीला वाचविण्यासाठीच कागदपत्रे नष्ट किंवा लपविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांकडून महापालिकेतील संबंधित विभागांची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याकडे लक्ष लागले आहे.