नागपुरमध्ये मोठी दुर्घटना ! फार्मा कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू, ६ जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात कामठी नजिकच्या भिलगाव येथे एका कंपनीत विस्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलीस स्टेशच्या हद्दीतअंकित प्लस फार्मासेच्युअल कंपनीमध्ये जीएलआरमधील स्लरी लिकेज होऊन त्याचे झाकण उडाले, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. यावेळी झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त निकेतन कदम घटनास्थळी पोहचले .जखमींना स्थानिक रुग्णलयात हलवले असल्याची माहिती आहे.
मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुधीर काळबांडे असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर दिनेश टेंभुर्णे,मंगेश राऊत,स्वप्नील वैद्य, आशिष बडगुडे, गणेश वानखेडे, युनूस खान जखमींना काम्पटी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांसह नातेवाईकांनीही मोठी गर्दी केली असून याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.