जुन्या वैमनस्याचा स्फोट; बारावीचा पेपर संपताच विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला, तिघे अल्पवयीन ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये भर घालत कोथरूड परिसरात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. बारावीची परीक्षा संपवून महाविद्यालयाबाहेर पडलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्यावर जुन्या वैमनस्यातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
कोथरूड येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयाबाहेर ही घटना घडली. संबंधित विद्यार्थी बारावीचा पेपर देऊन घराकडे जाण्याच्या तयारीत असतानाच, आधीच पाळत ठेवून असलेल्या तिघा अल्पवयीन मुलांनी त्याला रस्त्यात अडवले. शिवीगाळ करत त्यांनी सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने त्याच्यावर थेट वार केले. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या हल्ल्यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. पोलिस तपासात हल्ल्यामागील कारण उघड झाले असून, आरोपी आणि जखमी विद्यार्थी काही वर्षांपूर्वी वारजे येथील एकाच शाळेत शिकत होते. दहावीत असताना झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी सूड घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. यासाठी त्यांनी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र आणि वेळ याची आधीच माहिती मिळवून नियोजन केले होते.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.
भरदिवसा, तेही महाविद्यालयाच्या वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.