ठाकरे गटाने नितेश राणेंना डिवचलं; देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यात झळकले बॅनर्स
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – महायुतीतील सगळ्या पक्षांचा बाप भाजप असल्याने आमचा मुख्यमंत्री बसलाय, अशी टिमकी वाजवणाऱ्या नितेश राणे यांच्यामुळे सध्या सत्ताधारी गटात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्याबद्दल शिंदे गटाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नव्हे तर, ‘आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?’, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. यानंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर्स झळकताना दिसले. ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी ठाण्यातील मुख्य रस्त्यावर एक भलामोठा बॅनर लावला. ‘मी तुषार दिलीप रसाळ… दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत, असा मजकूर या बॅनरवर लिहला होता. हा बॅनर लावून ठाकरे गटाने राणे पिता-पुत्रांविरोधात एकप्रकारे दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता यावर नारायण राणे किंवा नितेश राणे काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नितेश राणे यांनी अलीकडेच धाराशिव येथील कार्यक्रमात त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण केले होते. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा, असा दमच नितेश राणेंनी दिला होता. यापूर्वीही नितेश राणे यांनी, ‘काय करायचं ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय…’ अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या सगळ्यामुळे महायुतीतील इतर पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नितेश राणे यांना खडसावल्याची माहिती आहे. कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. नारायण राणेंनी प्रकाश महाजनांवर टीका केल्यानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी देखील राणे पिता-पुत्रांना इशारा दिला होता. नारायण राणे जर, राज ठाकरे आणि तुमचे संबंध सांगण्यापलीकडे असतील तर तुम्ही तुमच्या बोलघेवड्या पुत्राला आवर घालणं अपेक्षित आहे. आणि महाराष्ट्र सैनिकांना धमक्या देण्याची हिंमत करु नका, आम्ही उगाच कोणाच्या काड्या करत नाही. आणि काड्या करणाऱ्याला सोडत नाही, असा थेट इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिला होता.