कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील तीन सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी
प्रकाश संकपाळ
कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ.इंदूराणी जाखड रुजू झाल्यापासून अनधिकृत बांधकाम, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा असो या सर्वांना वठणीवर आणण्याचं महत्वाचं काम त्या करीत आहेत. पालिकेच्या शासन सेवेतील ३ सहाय्यक आयुक्तांच्या त्यांच्या प्रभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. यामध्ये स्नेहा कर्पे, सोनम देशमुख व प्रीती गाडे यांचा समावेश आहे. स्नेहा कर्पे या ‘ह’ प्रभागात, सोनम देशमुख या ‘गं’ प्रभागात तर प्रीती गाडे या ‘अ’ प्रभागात कार्यरत होत्या.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यांच्याकडून ज्यांची चौकशी करायला पाहिजे त्यांची चौकशी त्या करत नाहीत तसेच ज्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई न करता तिकडे दुर्लक्ष करतात अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.
आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळत नाही, अनधिकृत बांधकामे असून तिथे लोकं राहतात पोलीस बंदोबस्त मिळाला की कारवाई करू अशी थातुरमातुर उत्तरे तक्रारदारांना त्या देत असल्याने याची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी त्या तीन सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी केली असल्याची चर्चा प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे.