मुंब्रा येथे इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांवरही हल्ला, एका आरोपीला अटक

Spread the love

मुंब्रा येथे इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांवरही हल्ला, एका आरोपीला अटक

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : मुंब्रा–कौसा परिसरात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व बांधकाम व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. आरोपींनी पोलिसांवरही गोळीबार केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर येऊन गोळीबार केला. या गोळीबारात घरासमोर उभ्या असलेल्या कारला एक गोळी लागून वाहनाचे नुकसान झाले. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेतही दोन गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाणे पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याऐवजी पोलिसांवरच गोळीबार केला. आरोपींनी दोन राऊंड गोळीबार केल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काळसेकर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (वय २८) याला अटक केली. या घटनेत त्याचा थेट सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेनंतर मुंब्रा–कौसा परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या बाबा खान यांच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon