उल्हासनगरमध्ये वाहन पार्किंगवरून वाद; महिलेला मारहाण केल्याचा आरोप, गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : घरासमोर वाहन उभे करण्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन महिलेला मारहाण झाल्याची घटना उल्हासनगर-५ मधील वीर तानाजी नगर, सेक्शन ४० परिसरात घडली. या प्रकरणी हिल लाईन पोलीस स्टेशन येथे सामाजिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला फिर्यादी (वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ मार्च रोजी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारा मोहसीन शेख हा त्याची अॅक्टिव्हा गाडी फिर्यादी महिलेच्या घरासमोर उभी करत होता. त्या वेळी येथे आमचा टेम्पो उभा करण्याची जागा असल्याचे महिलेने सांगितल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून मोहसीन शेख याने अश्लील शिवीगाळ करत महिलेला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, मोहसीनचा भाचा गुंगा उर्फ आरिफ हा घटनास्थळी आला आणि त्याने फिर्यादी महिला व तिच्या भावजयला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी महिलेच्या अल्पवयीन मुलालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले. तर आसमा शेख हिने मुलींचे केस ओढून मारहाण केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर जखमी महिला व तिची भावजय या तक्रार देण्यासाठी हिल लाईन पोलीस स्टेशन येथे गेल्या असता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, आरोपींनी पोलिसांकडे खोटी माहिती देत फिर्यादी महिला, तिचे पती तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुखर्जी नावाच्या व्यक्तीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत गायकवाड यांनाही दुखापत झाली असून मन्सूर सय्यद याने शिवीगाळ करून इतर व्यक्तींना बोलावून परिसरात दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबियांनी जेष्ठ समाजसेवक, श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांची भेट घेतली. आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबीयांना व साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.