नाशिकमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून परिचित असलेल्या डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात वास्तव्यास होत्या. शुक्रवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. मनीषा जेजुरकर या आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून परिसरात एक कुशल वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रासह ओळखीच्या व्यक्तींमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी सुसाईड नोट आढळली आहे की नाही, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. घटनेची नोंद गंगापूर रोड पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे आहेत की अन्य कोणते मानसिक दडपण होते, याचा तपास पोलीस करत असून परिसरातील नागरिक व नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.