एलटीटी स्थानकावर ‘रेल नीर’ ठेकेदाराकडून खंडणी; कॅन्टीन चालकाला मारहाण, दोघांना अटक
रवि निषाद / मुंबई
मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) परिसरात कॅन्टीन चालवणाऱ्या व्यावसायिकाकडून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली खंडणी उकळून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवप्रकाश रामलखन यादव (३७) हे एलटीटी स्थानकाजवळ कॅन्टीन चालवतात. सप्टेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सेतुरामानंद पिल्लई उर्फ सेतुभाई आणि सुभाष कांदर उर्फ सुभाषभाई यांनी यादव यांच्याकडून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली वारंवार पैशांची मागणी केली.
भीतीपोटी यादव यांनी आरोपींना सुरुवातीला एक लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात दिले. त्यानंतर आरोपींनी दरमहा ३० हजार रुपये देण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये यादव यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर यादव यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सेतुरामानंद पिल्लई आणि सुभाष कांदर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५१(३), ३०८(५), ३(५) आणि ११५(२) अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर सुलेपाटील करीत आहेत.