रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगर पंचायतीत मोठा राजकीय भूकंप!

रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगर पंचायतीत मोठा राजकीय भूकंप!

१० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून शिंदे गटाच्या शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीने नगरपंचायतीवर भगवा फडकवला

योगेश पांडे / वार्ताहर 

रायगड – रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगर पंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला असून, गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून शिंदे गटाच्या शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीने नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या म्हसळ्यात झालेल्या या सत्तांतरामुळे रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने आखलेली राजकीय खेळी अखेर यशस्वी ठरली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी गुरुवारी विशेष सभेत निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं होतं. उमेदवारी अर्जांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली आणि काही वेळातच निकाल जाहीर करण्यात आला. १७ पैकी ९ नगरसेवकांचं संख्याबळ एकत्र करत शिंदे गटाच्या शिवसेनेने बहुमत सिद्ध केलं. शिवसेनेकडून शाहिद जंजिरकर यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांना पराभव स्वीकारावा लागला.

म्हसळ्यातील हे सत्तांतर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा परिपाक मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षांसह ७ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत संबंधित नगरसेवकांविरोधात कारवाईची मागणी केली. जानेवारी २०२६ मध्ये रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ७ नगरसेवकांना अपात्र ठरवत शिंदे गटाला मोठा धक्का दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीनं गोगावले यांच्या राजकीय डावाला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरही गोगावले यांनी काँग्रेससोबत नवं समीकरण जुळवत पुन्हा एकदा म्हसळ्यात सत्ता मिळवली.

नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. खासदार सुनील तटकरे यांनीही बंडखोर नगरसेवकांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. तरीदेखील काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिंदे गटाने विजय मिळवत राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का दिला. दरम्यान, सत्ता स्थापन होताच नगराध्यक्षांच्या दालनातील खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवून बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे फोटो लावण्यात आल्यानं राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या घटनेला प्रतीकात्मक राजकीय संदेश मानले जात असून, म्हसळ्यात बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरू आहे.

निकाल जाहीर होताच शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके, घोषणाबाजी आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. म्हसळ्यातील हे सत्तांतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या राजकारणासाठी महत्त्वाचं मानलं जात असून, तटकरे विरुद्ध गोगावले हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon