पुण्यातील गणेश पेठेत पुन्हा एकदा चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; घटनेमुळे सर्वत्र खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यामध्ये एकीकडे गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे तर दुसरीकडे महिला आणि लहान मुलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नसरापूर, पर्वती परिसरातील घटना ताजी असताना आता पुण्यातील गणेश पेठेत पुन्हा एकदा चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील गणेश पेठ भागामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. एका ४७ वर्षीय आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचं या भागात दुकान होतं. या नराधमाने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून दुकानात बोलावलं होतं. पण, चिमुकलीच्या गोष्ट लक्षात येताच तिने आरडाओरड करत स्वतःची सुटका करून घेतली. चिमुरड्या मुलीचा आवाज ऐकून इतर लोक धावत गेले.
या चिमुरडीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर घटनेची मााहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या विकृत दुकानदाराला ताब्यात घेतलं आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये या विकृत दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहे.