ठाण्यातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; घोडबंदर रोडवर ८ ते १० मे दरम्यान वाहतुकीत बदल

ठाण्यातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; घोडबंदर रोडवर ८ ते १० मे दरम्यान वाहतुकीत बदल

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – ठाण्यातील घोडबंदर रोडवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ८ ते १० मे दरम्यान या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि काम सुरळीत पार पडण्यासाठी काही मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन येथे मुल्लाबाग बस डेपोजवळील फुटओव्हर ब्रिजवर आरपीएस -पीआरएस जॉईंट व्हेंचर प्रा. लि. यांच्या वतीने गर्डर उभारणीचे काम केले जाणार आहे. हे काम दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ८ मे रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून ९ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत चालणार आहे. तर दुसरा टप्पा ९ मे रात्री ११.५५ वाजल्यापासून १० मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

या कालावधीत घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन परिसरात वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.जड आणि अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामादरम्यान वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेळेचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ब्रह्मांड जंक्शन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने कामाच्या काळात काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी शक्यतो हा मार्ग टाळावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon