पालघरमधील हादरवणारी घटना; बसमध्ये चढण्यापूर्वी भोवळ येऊन महिलेचा जागीच मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे. हवामान विभागाकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिला आहे. यातच महामार्गालगत असलेल्या वरई फाटा येथे गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एका महिलेला चक्कर येऊन तिचा जागीच मृत्यू झाला. ही महिला वरई येथून सफाळेच्या दिशेने निघाली होती. मात्र एसटी बसमध्ये चढताना तिला चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून ती माघारी फिरली. मात्र तिथेच चक्कर येऊन ती खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हा उष्माघाताचा बळी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी उष्णतेचा यल्लो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. विशेष म्हणजे राज्यात उष्णतेचे चटके बसत असताना प्रशासनाने मात्र कुठल्याही प्रकारची विशेष कक्षाची व्यवस्था केलेली नाही. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, पोलिसांनी तिचा मृतदेह मनोर ग्रामीण रुग्णालयात नेला आहे.