भांडुपच्या डोंगराळ भागात बेकायदेशीररित्या गांजाची शेती; भाजपा नगरसेविकेनी केला पर्दाफाश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – नेस्को ड्रग्स प्रकरण ताजं, अमली पदार्थ, गांजा यांचे कोट्यवधींचे साठे जप्त होत असतानाच मुंबई महापालिकेच्या जागेवर चक्क गांजाची शेती केल्याचं समोर आलं आहे.
मुंबईच्या भांडूप पश्चिम येथे गांजाच्या शेकडो झाडांची शेती आढळून आली आहे, BMC च्या भांडुप हायड्रोलिक जलाशय भागातच गांजाची शेकडो झाडांची शेती करत असल्याचे समोर आले आहे.भांडुप हायड्रोलिक जलाशय येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची शेती केल्याची माहिती स्थानिक भाजपा नगरसेविका जागृती पाटील यांना मिळाली.
माहिती मिळताच नगरसेविका जागृती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ भांडुप पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देण्यात आली.भांडुप पोलिसांनी या माहितीची तातडीने दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आणि डोंगर भागात लागवड केलेली १०० हून अधिक गांजाची झाडे पूर्णपणे नष्ट केली.पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. ही झाडं नेमकी कुणी आणि कधी लावली याचा तपास सुरू आहे.
गांजा तसेच नशेसाठी वापरण्यात येणारे अमली पदार्थ वापर, विक्रीसाठी बंदी आहे. मात्र यांचा वापर छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहण्यास मिळते.