पुण्यात लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघड; ५ लाख घेतल्यानंतर दीड लाख घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

पुण्यात लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघड; ५ लाख घेतल्यानंतर दीड लाख घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे : शहर पोलिस दलात लाचखोरीचे प्रकार उघडकीस येण्याचे सत्र सुरूच असून, ५ लाख रुपयांची लाच आधीच स्वीकारल्यानंतर आणखी दीड लाख रुपये घेताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. तो कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मालकाविरुद्ध हैदराबाद न्यायालयात धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरण सुरू होते. या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघाले होते. हे वॉरंट बजावू नये, तसेच अटक टाळण्यासाठी कस्पटे याने ३ मार्च २०२६ रोजी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती.

त्यानंतर १ मे रोजी वॉरंट पुन्हा परत आल्याचे सांगत अटक टाळण्यासाठी आणि ‘मदत’ करण्याच्या नावाखाली त्याने अडीच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २ लाखांवर व्यवहार ठरला; मात्र तक्रारदाराने याबाबत ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणीत कस्पटे याने पूर्वी ५ लाख स्वीकारल्याचे मान्य करत नव्याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोट क्लब रोडवरील सुलक्स कल्पतरू गार्डन परिसरात सापळा रचला. बुधवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास तक्रारदाराकडून दीड लाख रुपये स्वीकारताना कस्पटे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ताब्यात घेताना कस्पटे याने तक्रारदाराच्या छातीस चावा घेतल्याची, तसेच सापळा पथकाशी झटापट करून शासकीय कामात अडथळा आणत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon