एअरपोर्ट परिसरातील घरफोडीचा उलगडा; आंतरराज्य टोळीतील सहा जण अटकेत, ११.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव : शहरातील एअरपोर्ट परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा जळगाव पोलिसांनी यशस्वी उलगडा करत आंतरराज्य गुन्हेगारी टोळीतील सहा आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून ५ लाख ४७ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने तसेच ५ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी हे विविध राज्यांमध्ये घरफोडीच्या घटना घडवणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईस मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस पथकाने संयुक्तपणे अंमलबजावणी केली. पुढील तपास सुरू असून, या टोळीचा इतर गुन्ह्यांशीही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, जळगाव पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत दक्ष असून, अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.