जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीचे पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यात जुन्या वादातून पुण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ हि गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सध्या अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जुन्या वादातून साहिल महेंद्रसिंग चव्हाण व बालाजी रामजी उमाप यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मोजेश शेखापुरे या तरुणावर गोळीबार केला होता. या घटनेबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेट परिसरात लपून बसले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी परिसर चारही बाजूंनी घेरून छापा टाकला.
दरम्यान, पोलिसांनी अचानक झडप घालून दोन्ही आरोपींना कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. तसेच आरोपींकडे विचारपूस करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडे केलेल्या चौकशीतून गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावेही निष्पन्न झाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.