भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद, २७ मोटारसायकली जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या २७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविंद्र भदाणे आणि गजानन कोळी (दोघेही रा. जामनेर) यांचा समावेश आहे. या दोघांकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या दुचाकींचा साठा पोलिसांनी हस्तगत केला.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन, बजाज पल्सर, सुझुकी बर्गमन यांसह विविध कंपन्यांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ६५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने सखोल तपास करत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.