सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा मोठा कट उधळला! ‘लेडी गँग’च्या मुसक्या आवळल्या; ९ महिला अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापूर – मुंबईहून सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या गजबजलेल्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये मोठ्या दरोड्याचा कट रचणाऱ्या एका अट्टल महिला टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने बेड्या ठोकल्या आहेत.आरपीएफच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, या कारवाईत एकूण नऊ संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही टोळी सोलापूर आणि पुणे विभागात सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हा सगळा घटनाक्रम बुधवारी सुरू झाला. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर तैनात असलेले गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना तीन महिला संशयास्पदरित्या वावरताना दिसल्या. सुरुवातीला चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले, पण काही वेळातच या महिला लातूर एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसल्या. मुंडे यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ सोलापूर विभागाला ‘हाय अलर्ट’ जारी केला.
या महिला केवळ प्रवासी नसून त्या ट्रेनमध्ये रेकी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. जेऊर स्थानकावर उतरल्यानंतर या महिलांनी चोरीच्या उद्देशाने सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, आरपीएफचे पथक आधीच त्यांच्या मागावर होते. प्रवाशांची गर्दी आणि गाड्यांचा वेग लक्षात घेता, पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने पाळत ठेवली.
सोलापूर स्थानकावर गाडी पोहोचण्यापूर्वीच आरपीएफचे पथक सज्ज झाले होते. महिला कॉन्स्टेबल सोनम पठाण आणि त्यांच्या टीमने सापळा रचून या नऊही महिलांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या महिलांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असून, त्या सर्व धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. जर ही टोळी आपल्या मनसुब्यात यशस्वी झाली असती, तर अनेक प्रवाशांना आपले दागिने आणि मौल्यवान वस्तूंना मुकावे लागले असते. रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.