जळगावात कर्कश्य सायरनच्या बुलेटवर पोलिसांची कारवाई; ध्वनी प्रदूषणाविरोधात विशेष मोहीम

जळगावात कर्कश्य सायरनच्या बुलेटवर पोलिसांची कारवाई; ध्वनी प्रदूषणाविरोधात विशेष मोहीम

पोलीस महानगर नेटवर्क 

जळगाव : जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी कर्कश्य सायरन लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट दुचाकींविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिले आहेत.

अनेक बुलेट चालकांकडून वाहनांमध्ये अनधिकृतरीत्या कर्कश्य सायरन बसवून रस्त्यावर मोठ्या आवाजात ध्वनी निर्माण केला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. या सायरनमुळे नागरिकांना त्रास होत असून, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी जिल्हाभर विशेष तपास मोहीम सुरू केली आहे. वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांकडून रस्त्यांवर तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत सायरन तत्काळ काढून टाकण्याचे आदेशही संबंधित वाहनचालकांना देण्यात येत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रकारांविरोधात सहकार्य करावे. ध्वनी प्रदूषण रोखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जळगाव पोलिसांची ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon