‘मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय…नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार’; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
नांदेड – मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे. नांदेड बस स्थानकाच्या तक्रार पेटीमध्ये चिट्ठी टाकलेली आहे. त्यात बॉम्ब स्फोट होणार आहे, अशी माहिती नांदेडच्या पोलीस नियत्रंण कक्षाला एकाने फोन करून दिलीय. ५ मार्च रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यावरून पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली. नांदेड शहरातील बस स्थानकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना तक्रारपेटी तपासण्यास सांगण्यात आले. त्यात बॉम्बस्फोट होणार असा मजकूर लिहिलेली चिट्टी आढळली. दरम्यान या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. अशातच फोन नेमका कोणी केला याचा पोलिसांनी तपास सुरु केला असता वजीराबाद पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि अंबाजोगाई येथून फोन करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
सायबर सेलच्या मदतीने तपास करण्यात आला तेव्हा बीड जिल्हयातील आंबेजोगाई येथून फोन आल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर वजीराबाद पोलीसांनी आंबेजोगाई गाठली आणि तपासाअंती एका पाणीपुरी वाल्याच्या मोबाईलवरून तो फोन करण्यात आल्याचे उघड झाले. पोलीसांनी पाणीपुरी वाल्याची चौकशी केली. त्यात एका अज्ञाताने महत्त्वाचा फोन करायचा म्हणून मोबाईल घेतला होता, असे त्याने सांगीतले. पाणीपुरीवाल्याकडून पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन प्राप्त केले. यावेळी स्थानिक पोलीसांची मदत घेण्यात आली. त्या माहितीच्या आधारे बेजोगाई येथील मनियार गल्ली रवीवार पेठ येथून ३५ वर्षीय शेख सलीम शेख चांदपाशा याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले. आपणच फोन करून बस स्थानकात चिट्टी टाकून खोटी माहिती दिली, अफवा पसरवली, अशी कबुली आरोपी शेख सलीम याने पोलीसांना दिली. सद्या शेख सलीम याला वजीराबाद पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पूने यांनी दिली आहे.