बहुचर्चित न्यू कावेरी हॉटेलवरील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगाराला अखेर अटक
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – अहिल्यानगमधील जामखेड तालुक्यातील बहुचर्चित न्यू कावेरी हॉटेलवरील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (२४) याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. रोहित अनिल पवार याच्यावर जीवघेणा गोळीबार करून पसार झालेला मोरे याला खर्डा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांनी ६ मार्च रोजी संयुक्त कारवाई करत ही धडक कारवाई केली. काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीच्या हालचालींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
कान्होपात्रा नगर येथील रोहित अनिल पवार (२९) हा न्यू कावेरी हॉटेलमध्ये असताना त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात रोहित पवार गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात शुभम शहाराम लोखंडे, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद, अक्षय उर्फ चिंग्या मोरे, अर्शद अमीन सय्यद आणि अन्य ६ ते ७ साथीदारांनी एकत्र येऊन हल्ला केल्याचं निष्पन्न झालं आहे. हल्लेखोरांनी सत्तूर व लाकडी दांडक्यांनी हॉटेलमधील साहित्याची तसेच तेथे उभी असलेल्या फॉर्च्युनर गाडीची तोडफोड केली होती. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच आर्म्स अॅक्टनुसार (गु.र.नं. 669/2025) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्य आरोपी अक्षय मोरे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो खर्डा परिसरात आल्याची माहिती कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, समीर अभंग, जामखेडचे पो.उ.प.नि किशोर गावडे, पुष्कर कडू तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी अशा १० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.