पत्नीसोबत वादाच्या नैराश्यातून
नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन पोलिस हवालदाराची आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – कौटुंबिक कलहातून पोलिस कॉन्स्टेबलने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शीलरत्न भीमराव बेलेकर (४५), असे मृताचे नाव आहे. ते प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शीलरत्न बेलेकर यांचा दोन महिन्यांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहे. त्यांचा मुलगा आठवीत तर मुलगी चौथीत शिकते. दोघांचा ताबा शीलरत्न यांच्याकडे आहे. अपत्यांचा ताबा मिळावा यासाठी पत्नी त्यांच्यामागे तगादा लावायची. यावरून शीलरत्न व त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. १९ फेब्रुवारीला ते प्रतापनगर पोलिस ठाण्यात गेले नाही. तेव्हापासून ते गैरहजर होते.
रविवारी दुपारी शीलरत्न हे त्यांचे भाऊ अजय भीमराव बेलेकर (४९) यांच्याकडे आले. काही वेळानंतर ते घरून निघाले. त्यानंतर त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही. अजय यांनी शीलरत्न हे बेपत्ता असल्याची तक्रार प्रतापनगर पोलिसांत दिली. दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावात मृतदेह तरंगताना दिसला. अंबाझरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. शीलरत्न यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सततची ड्युटी, वाढता कामाचा ताण, अपुरी विश्रांती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक पोलीस कर्मचारी मानसिक तणावाला सामोरे जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना एका कार्यरत पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याने दलातील मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन, तणावमुक्ती उपक्रम आणि मानसिक आरोग्य सहाय्य व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.