सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारी धक्कादायक घटना समोर!
फळांना उंदीर मारण्याचं औषध लावणाऱ्याला मनसे स्टाइल दणका; परप्रांतीय फळ विक्रेत्यांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मालाड परिसरातून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. मालाडमधील दोन फळ विक्रेत्यांनी फळांना उंदीर मारण्याचे औषध लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उंदरांपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर उंदीर मारण्याचे राटोल हे विषारी औषध लावणाऱ्या दोन परप्रांतीय फळ विक्रेत्यांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे सैनिकांनी संबंधित विक्रेत्यांना मनसे स्टाईल चोपही दिल्याचे समोर आले आहे.
मालाडमधील एका फळ विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये विक्रेता फळांवर उंदीर मारण्याची क्रीम लावत असल्याचे दिसून आले. रात्री गोदामात किंवा गाडीवर ठेवलेली फळे उंदरांनी खाऊ नयेत यासाठी हा प्रकार केला जात होता. मात्र, हेच विषारी औषध लावलेली फळे नागरिकांकडून खरेदी केली जात होती. ही फळं नागरिकांच्या पोटात गेल्यास त्यांना उलट्या, पोटदुखी, विषबाधा आणि लिव्हर निकामी होण्यासारखे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.
या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे नेते कुणाल साळुंके आणि इतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित विक्रेत्याला याबद्दल जाब विचारला. यानंतर त्या फळ विक्रेत्याला मनसे स्टाईलने मारहाण केली. त्यानंतर याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली.
यानंतर मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण तक्रारीची तात्काळ दखल घेत दोन फळ विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. मनोज कुमार केसरवाणी आणि बिपीन केसरवाणी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली दिली की “उंदीर फळे खातात, म्हणून आम्ही त्यावर औषध लावत होतो. या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 125, 274, 275 आणि 286 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. या संबंधित विक्रेत्याचे बेकायदेशीर दुकान जमीनदोस्त केले आहे. तसेच रात्री उशिरा फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने जप्त केले आहेत. या घटनेनंतर मालाड पोलिसांनी परिसरातील इतर फेरीवाल्यांचीही कसून चौकशी आणि कारवाई सुरू केली आहे. जर प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.