१३ हजारांच्या खोलीत ‘कोटींचा’ ड्रग्ज कारखाना; अंधेरीत एमडी रॅकेटचा पर्दाफाश

१३ हजारांच्या खोलीत ‘कोटींचा’ ड्रग्ज कारखाना; अंधेरीत एमडी रॅकेटचा पर्दाफाश

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : अवघ्या १३ हजार रुपये भाड्याच्या छोट्याशा खोलीतून दरमहा २५ ते ३० कोटी रुपयांचा सिंथेटिक ड्रग्ज व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांच्या खार विभागाने केलेल्या कारवाईत अंधेरीतील सहार रोड परिसरातील भास्कर चाळीत एमडी (मेफेड्रोन) तयार करणाऱ्या गुप्त फॅक्टरीचा पर्दाफाश झाला.

गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख याला ताब्यात घेतले. चौकशीतून अंधेरीतील भाड्याच्या खोलीत एमडी ड्रग्ज तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती समोर आली. तत्काळ छापा टाकून पोलिसांनी १५.४४ ग्रॅम तयार एमडी, रसायने, उपकरणे आणि मोबाइल जप्त केले.

आरिफ हा २०२३ मध्ये गुजरात पोलिसांच्या ताब्यातून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झाला होता. त्याच्यावर १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी त्याने सांताक्रूज (पूर्व) येथील गोळीबार नगरमध्ये कुटुंबासह वास्तव्यास राहून अंधेरीत स्वतंत्र खोली भाड्याने घेतली होती. याच ठिकाणी त्याने अत्यल्प साधनसामग्रीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज उत्पादनाची यंत्रणा उभी केली.

या रॅकेटमध्ये त्याची पत्नी नसरीन हिचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. ती ड्रग्ज विक्रीतून मिळणाऱ्या पैशांची मोजदाद करत होती. तिच्या बँक खात्यात जमा असलेले सुमारे २६ लाख रुपये पोलिसांनी गोठवले असून तिचीही चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य साथीदार रिजवान अहमद लियाकत अली याला उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून अटक करण्यात आली आहे. तो या कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेत मदत करत असल्याचे उघड झाले आहे.

आरिफ स्थानिक पातळीवर विक्री टाळून बाहेरील नेटवर्कद्वारे ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या नव्या पद्धती उघड झाल्या असून पोलिसांनी संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर तब्बल तीन वर्षे मुंबईत मुक्तपणे ड्रग्ज कारखाना चालवत होता, ही बाब समोर आल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon