कल्याणमध्ये पोलीस ठाण्याबाहेरच राडा!

कल्याणमध्ये पोलीस ठाण्याबाहेरच राडा!

तलाक वादातून सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला; दोघे गंभीर जखमी, पती अटकेत

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – माणुसकीला काळिमा फासणारी घटना कल्याणमधून उघडकीस आली आहे. वालधुनी येथील अशोक नगर परिसरात एका महिलेवर तसेच तिच्या भावावर सासरच्या मंडळींनी मिळून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला आणि तिच्या भावाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने मीरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात चाकू आणि दगडाचा वापर करण्यात आला होता. यामुळे दोघांच्या शरीरावर ८ ते १० टाके पडले असल्याची माहिती आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावर घडला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १२ एप्रिल २०२६ रोजी वादावर पडदा टाकण्यासाठी आणि तलाक संदर्भात चर्चा करण्यासाठी दोघांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत वाद उफाळून आला. सासर आणि माहेरच्या मंडळींमध्ये जोरदार भांडण झाले.घरात सुरू झालेला हा राडा पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. आरोपींनी रुक्सारला मारहाण आणि शिवीगाळ केली. यानंतर दोन्ही बाजूचे लोक तक्रार देण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्याकडे निघाले.

रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम हे पोलीस ठाण्याजवळ पोहोचले असताना, आरोपींनी त्यांच्यावर भररस्त्यात चाकू आणि दगडाने हल्ला केला. हा जीवघेणा हल्ला पती, सासरा, दीर आणि नणंदेकडून करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बहीण-भाऊ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत पोलीस ठाण्यात शिरले. आरोपी त्यांचा पाठलाग करत पोलीस ठाण्याच्या आवारापर्यंत पोहोचले होते.

या हल्ल्यात अस्लम आणि रुक्सार यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्या शरीरावर ८ ते १० टाके पडले असून, अस्लमची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. महात्मा फुले पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी पती तन्वीर खान याला बेड्या ठोकल्या आहेत. माहितीनुसार, तन्वीर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. सध्या सासरा आणि दीर फरार असून, पोलिसांकडून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon