मराठी बोला, अन्यथा घरी बसा!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा झटका; आरटीओ अधिकारीही रडारवर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येणार नाही, त्यांचे परवाने थेट रद्द करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. परिवहन विभागाने आपल्या जुन्या नियमांची आता काटेकोरपणे अंमलबजावणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. टॅक्सी-रिक्षा चालकच नव्हे तर मराठी भाषेच्या नियमाला डावलून परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी मराठी भाषेचा मुद्दा तापला असताना काही रिक्षा चालकांनी आपल्याला मराठी येत नाही, मराठी शिकणार नसल्याचे म्हटले होते. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मराठीचा अपमान झाल्याच्या मुद्यावर काहींना मारहाणीचे प्रकारही घडले होते. मराठी-बिगर मराठीच्या मुद्यावर वातावरण तापलं असताना परिवहन विभागाच्या नियमांना डावलून परवाने दिले जात असल्याचे समोर आले होते.
परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, मोटार परिवहन विभागाच्या नियमावलीत स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कडकपणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यास टाळाटाळ करतात किंवा त्यांना मराठी समजत नाही, अशा तक्रारींचा ओघ वाढला होता. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील ५९ प्रादेशिक (आरटीओ) व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यादरम्यान रस्त्यावर चालकांची पडताळणी केली जाईल. संबंधित चालकाला मराठी लिहिता आणि वाचता येते का, याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे.
मंत्री सरनाईक यांनी केवळ चालकांनाच नाही, तर अधिकाऱ्यांनाही इशारा दिला आहे. जे अधिकारी नियमांकडे दुर्लक्ष करून मराठी येत नसलेल्या चालकांना चुकीच्या पद्धतीने परवाने देतात, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. “ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो, त्या राज्याच्या भाषेचा आदर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.