प्रभाग १९ मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहिम; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, १२ हजारांचा दंड वसूल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने प्रभाग क्रमांक १९ मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. हाजुरी परिसरात झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपायुक्त मधुकर बोडके, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व राजेंद्र फाटक, नगरसेविका मीनल संख्ये व नम्रता भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. नागरिकांनीही स्वच्छतेची शपथ घेत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या ‘डीप क्लीन ड्राईव्ह’अंतर्गत संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजुरी, जीलानीवाडी, नयनवाडी चौक ते जे. के. बेकरी, अर्जुना पार्क, नुरी रोड, ग्रीन रोड, पप्पू ढाबा ते सुर्वेवाडी, तसेच हनुमान मंदिर ते मस्जिद मार्गे एकवीरा देवी मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. रस्त्यांवर साचलेला रॅबिट कचरा, माती व घनकचरा उचलून रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले.
या मोहिमेत सुमारे १५० महापालिका कर्मचारी, फायलेरिया विभाग, गार्डन विभाग, मलनिस्सारण विभाग, चार आर्यन वाहने, अतिक्रमण पथक तसेच नौपाडा प्रभाग समितीचे कर्मचारी सहभागी झाले होते. अस्वच्छता करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत एकूण १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
भरवस्तीत राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत दिसून येत असून, नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.