मुंबईच्या ‘ग्रोथ इंजिन’ला चालना देणारा पालिकेचा अर्थसंकल्प : महापौर रितू तावडे

Spread the love

मुंबईच्या ‘ग्रोथ इंजिन’ला चालना देणारा पालिकेचा अर्थसंकल्प : महापौर रितू तावडे

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प हा मुंबईच्या रूपातील देशाच्या ‘ग्रोथ इंजिन’ला गती देणारा असून, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची स्पष्ट दिशा मांडणारा आहे, अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केली.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सादर केलेल्या या अर्थसंकल्पात रस्ते, पदपथ, पूल, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधा प्रकल्प, सामाजिक घटकांचे कल्याण, पर्यावरण संवर्धन तसेच अद्ययावत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांचा समावेश करण्यात आला आहे. अधिकाधिक सूचनांचा विचार करून मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प सादर केल्याचे समाधान महापौरांनी व्यक्त केले.

महानगरपालिकेचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘ग’ हे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे सादर केले. तर शिक्षण खात्याचे ‘ई’ अर्थसंकल्पीय अंदाज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्याकडे सादर केले.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना महापौर तावडे म्हणाल्या की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूपाने तिसरे ‘इंजिन’ जोडले गेले असून, या ‘ट्रिपल इंजिन’च्या गतीशी सुसंगत असा बळकट अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. वित्तीय शिस्त, पायाभूत सुविधांची पूर्तता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षणात भरीव तरतूद, पर्यावरण संरक्षण, प्रशासकीय कार्यक्षमता, आपत्कालीन सज्जता तसेच व्यवसाय सुलभता व सामाजिक उपक्रम या सात वचनांच्या आधारे मांडलेला हा अर्थसंकल्प मुंबईकरांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करतो, असे त्यांनी नमूद केले.

महापौरांनी पुढे सांगितले की, अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्रे देणे, वर्षभर राबविण्यात येणारे ‘मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’ अभियान, तसेच शहराच्या चारही प्रमुख प्रवेश मार्गांवर भव्य प्रवेशद्वार व घड्याळ मनोरे उभारण्यासारख्या सूचनांचा मुख्य अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प विद्यार्थीभिमुख असून, मिशन सफल, शालेय इमारतींची बांधणी व दुरुस्ती, ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा, विज्ञान पार्क, डिजिटल क्लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा व ग्रंथालयांचे अद्ययावतीकरण, शाळांमध्ये सीसीटीव्ही, सायबर साक्षरता प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसमधून मोफत प्रवास यांसारख्या योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon