अभ्यासाच्या बहाण्याने जवळीक, शीतपेयात गुंगीचे औषध; कल्याणमध्ये तरुणीवर अत्याचार
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करत शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून ३४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सागर सुरेश शिंदे (वय ३६) याच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीशी जानेवारी २०२४ मध्ये ओळख झाली होती. अभ्यासात मदत करण्याच्या निमित्ताने त्याने तिच्याशी मैत्री वाढवली आणि हळूहळू तिचा विश्वास संपादन केला. १ मे रोजी आरोपी तरुणीच्या घरी गेला असता, त्याने स्वतः आणलेल्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले. ते शीतपेय पिल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्याची संधी साधत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेची समजूत काढली. ११ मे रोजी त्याने तिला ठाण्यातील एका मित्राच्या घरी नेऊन पुन्हा जबरदस्तीने संबंध ठेवले. या घटनेनंतर दोन दिवसांनी आरोपीने पीडितेचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे त्याने पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या अत्याचार आणि धमक्यांमुळे मानसिक ताण सहन न झाल्याने अखेर पीडित तरुणीने खडकपाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, धमकी तसेच अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.