बारामतीत पोलिसांची धडक कारवाई; पाण्याच्या टाकीत लपवलेला ४७० किलो गांजा जप्त, अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

बारामतीत पोलिसांची धडक कारवाई; पाण्याच्या टाकीत लपवलेला ४७० किलो गांजा जप्त, अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस महानगर नेटवर्क

बारामती : शहर व परिसरात बेकायदेशीर अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४७० किलो वजनाचा आणि सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा जप्त केला. जळोची रस्ता परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत हा साठा अत्यंत गुप्तपणे लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई बारामती शहर पोलिसांनी विशेष नाकाबंदी व तपासणी मोहिमेदरम्यान उघडकीस आणली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे आणि कठोर तपासणीमुळे हा मोठा साठा हस्तगत करण्यात यश आले.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या थेट नियंत्रणाखाली बारामती विभागातील पाच तालुके व १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक नाकाबंदी राबवण्यात आली होती. रात्रीची गस्त, वाहनांची कसून तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असतानाच ही माहिती पोलिसांना मिळाली.

शनिवारी (दि. २८) शहर पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून जळोची रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेत १,५०० लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या संशयास्पदरीत्या कुलूप लावून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करताच प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी व त्यांच्या विशेष पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टाक्यांची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणावर गांजाची पाकिटे आढळून आली. दोन पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा साठा जप्त करण्यात आला.

जप्त मालाचे वजन ४७० किलो असून, बाजारभावानुसार प्रति किलो सुमारे ५० हजार रुपये दराने त्याची किंमत अंदाजे २ कोटी ३५ लाख रुपये इतकी असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. पोलिसांच्या कडक तपासणीची कुणकुण लागल्याने आरोपींनी हा साठा तेथेच टाकून पळ काढल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, हा साठा नेमका कुठून आणण्यात आला आणि कुठे वितरित होणार होता, याचा सखोल तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon